दीपस्तंभ

महाराष्ट्रातील तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील थोर समाजसेवक, देशभक्त श्री अण्णासाहेब वर्तक यांच्या घरी 9 फेब्रुवारी 1914 रोजी भाऊसाहेब वर्तक यांचा जन्म झाला. आपल्या अंगी असलेल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी सामाजिक राजकीय आणि धार्मिक आघाडीवर अनेक जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वीरित्या पार पाडल्या. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास विरार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून आल्यावर खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष , महाराष्ट्र शासन मंत्री , महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे सचिव , खजिनदार , महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री , नागरी पुरवठा, खारभूमी व मच्छीमार खात्याचे मंत्री अशी अनेक जोखमीची पदे निर्धाराने व निर्भयपणे सांभाळली.

महाराष्ट्रातील तीन वर्षाच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी कै. सी.आर. राजाणी , कै. रामभाऊ राऊत यांच्यासारख्या उत्तम सहकाऱ्यांच्या सहकार्याने वसई तालुका पीपल्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले. सर्वसामान्य लोकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या, अनेक पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

1941 साली म्हणजे वयाच्या 27 व्या वर्षी ते जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद म्हणून बिनविरोध निवडून आले आणि त्याच वर्षी आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेची स्थापना करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आगाशी येथील काशिदास घेलाभाई हायस्कूल हे विद्यालय मोठ्या आत्मविश्वासाने चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. थोड्याच अवधीत विरार, अर्नाळा, नाळे, चांदीप या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू करून शिक्षणाची दालने सर्वसामान्यांसाठी खुली केली. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन व्यवसायिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली. भाऊसाहेबांच्या अविरत कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना बहुमानाचा अशा पद्मश्री किताब देवून सन्मानित केले . पद्मश्री भाऊसाहेब वर्तक हे एक तेजोमय गुणवंत आणि म्हणूनच असामान्य व्यक्तिमत्व होते. आदर्शाचा महामेरू असा हा भाग्यविधाता 7 ऑक्टोबर 1998 रोजी अनंतात विलीन झाला. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या उदात्त कार्याचा वारसा त्यांच्या पुढील पिढीने नेटाने चालू ठेवला. वर्तक परिवाराने वसई-विरारमध्ये ज्ञानाची गंगा सुरू केली, त्या गंगेचा प्रवाह वाहता ठेवण्याचं काम आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विकास (बंधू) वर्तक करत आहेत. 2016 साली या ज्ञान गंगेला एक नवीन वळण मिळालं ते म्हणजे 'पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय' या पदवी महाविद्यालयाच्या स्थापनेतून . सदर महाविद्यालयाच्या स्थापनेने संस्थेच्या पहिल्या पदवी महाविद्यालयाचा पाया रोवला. अशाप्रकारे पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा झरा अविरत चालू राहिला. भविष्यात महाराष्ट्रात जेव्हा शिक्षणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सर्वात पहिलं नाव कोरलेल असेल ते म्हणजे शिक्षण महर्षी पद्मश्री भाऊसाहेब वर्तक .

आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेत कार्यरत असणारे आम्ही सर्व सेवक, 'पद्मश्री भाऊसाहेब वर्तक' यांचे आजन्म ऋणी राहू. अशा या सिद्ध पुरुषाच्या स्मृतीस आमचा कोटी कोटी प्रणाम.