मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत विरार येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राच” हा विशेष उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन संस्कृती जोपासणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या 15 दिवसीय उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उपक्रमांचे स्वरूप :
1.वाचन कौशल्य कार्यशाळा: विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्यावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये प्रभावी वाचन पद्धती, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आणि वेगवान वाचनाचे तंत्र शिकवले गेले.
2. विद्यार्थ्यांचा टॉक शो: या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकांवर चर्चा केली. वाचनाचे महत्त्व, त्यांचे अनुभव, आणि वाचनामुळे त्यांच्या जीवनावर झालेल्या सकारात्मक परिणामांविषयी विचार मांडले.
3. गट वाचन सत्रे गट वाचन सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुस्तके वाचली. हे सत्र विचारांची देवाणघेवाण आणि समविचारी वाचकांसोबत संवादासाठी उपयुक्त ठरले.
4. पुस्तक प्रदर्शन पुस्तक प्रदर्शनात विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली. विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधील उत्तम साहित्याचा परिचय करून दिला गेला.
5. शब्दकोश वापर कार्यशाळा विद्यार्थ्यांना शब्दकोशाचा प्रभावी वापर कसा करावा हे शिकवले गेले. यामुळे त्यांच्या भाषिक ज्ञानात सुधारणा झाली आणि आत्मविश्वास वाढला.
6. माइंडमेज क्रियाकलाप विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी माइंडमेज उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध प्रश्नमंजुषा आणि कोडी सोडवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
7. लेखक भेट नामवंत लेखकांसोबत संवाद सत्र आयोजित करण्यात आले. लेखकांनी वाचनाची गोडी कशी निर्माण करावी, तसेच लिहिण्याचे तंत्र यावर मार्गदर्शन केले.
8. शाळा संपर्क – वाचन सत्र जिल्हा परिषद शाळांमध्ये वाचन सत्रांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शाळांतील विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले आणि पुस्तके वाचून दाखवली.
9. “वाचन कट्टा” या नवकल्पनात्मक उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थी वाचन आणि विचारांच्या आदानप्रदानासाठी एकत्र येण्यास प्रोत्साहित झाले.
उपक्रमाची यशस्विता या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी आत्मीयता निर्माण केली. वाचनाचे महत्त्व फक्त शैक्षणिक नाही तर वैयक्तिक विकासासाठी देखील किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे योगदान लाभले.
वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सर्व स्तरांतून मान्य करण्यात आले. उपस्थितांनी या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि अशा अनेक कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.